विदगाव, भोकर व डिकसाईतील धाडसी ग्रामस्थांसह पोलिसांच्या तत्परतेचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोकर येथील भारतीय स्टेट बँकेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी, गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.