कलाकंद, मावा अन् काजू कतलीत भेसळ; बजाजनगरातील नामांकित मिठाई दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित, एफडीएचा दणका. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या तोंडावर मिठाईच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून समोर आले आहे. बजाजनगर परिसरातील 'बिकानेर मिठाईवाला' या दुकानात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाची मिठाई तसेच अन्नपदार्थांचा तब्बल ६३.५ किलो साठा आढळून आला. १९ हजार ३१० रुपये किमतीचा हा साठा जागेवरच नष्ट करून 'एफडीए'ने दुकानाचा परवाना तत्काळ निलंबित केला.